YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 22:1-9

यहोशवा 22:1-9 MARVBSI

मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना बोलावून सांगितले, “परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व केले आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली. आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंदांना सोडून गेला नाहीत आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली. आता तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुमच्या भाऊबंदांना विसावा दिला आहे, तर परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेपलीकडे तुम्हांला जो देश तुमच्या ताब्यात दिला आहे तेथे तुम्ही आता आपापल्या डेर्‍यांकडे परत जा. मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जिवेभावे त्याची सेवा करा.” मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले, आणि ते आपापल्या डेर्‍यांकडे चालते झाले. मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्‍चिमेस त्यांच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले होते. यहोशवाने त्यांना आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला, “विपुल पशू आणि रुपे, सोने, कांसे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेर्‍यांकडे परत जा; आपल्या शत्रूंपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंदांबरोबर वाटून घ्या.” मग रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्राएल लोकांतून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले.