यहोशवा 1:1-9
यहोशवा 1:1-9 MARVBSI
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, “माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे. रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”

