तेव्हा ईयोब म्हणाला, “खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे; पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? तो देवाशी वाद करू लागला तर हजार गोष्टींतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे; त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतांना नकळत अचानक हटवतो, तो आपल्या क्रोधाने त्यांना उलथून टाकतो. तो पृथ्वीस कापवून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही; तो तार्यांना मोहोरबंद करतो, तोच आकाशमंडळ विस्तारतो, तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरींवरून चालतो. त्यानेच सप्तऋषी, मृगशीर्ष, कृत्तिका व दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे उत्पन्न केली. तो अतर्क्य महत्कृत्ये, अगणित अद्भुत कृत्ये करतो. पाहा, तो माझ्याजवळून जातो तरी मला दिसत नाही; तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? ‘तू हे काय करतोस,’ असे त्याला कोण म्हणणार? देव आपला क्रोध आवरत नाही; राहाबाचे1 सहकारी त्याच्यापुढे दबून जातात. तर मी त्याला उत्तर द्यावे; आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा, असा मी कोण आहे? मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्याची मी विनवणी करतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते; तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खातरी झाली नसती. कारण तो वादळाने माझा चुराडा करतो, विनाकारण मला घायावर घाय करतो. तो मला श्वासही घेऊ देत नाही, तो मला क्लेशाने व्यापून टाकतो. बलवान कोण? असा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणील? मी निरपराध असलो तरी माझे तोंड मला अपराधीच ठरवील; मी निर्दोष असलो तरी तो मला दोषीच ठरवील.
ईयोब 9 वाचा
ऐका ईयोब 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 9:1-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ