तेव्हा परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला, “अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला हे विचारतो; मला सांग. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे? तिला मापनसूत्र कोणी लावले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसवली? त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला. समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला? त्या समयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरूण घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले; मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्याला अडसर व दरवाजे लावले; आणि मी म्हणालो, ‘तू येथवरच ये; ह्यापलीकडे तू येता कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत.’ तू जन्मात कधी प्रातःसमयाचे नियमन केले आहेस काय? प्रभातेला आपले स्थान दाखवून दिले आहेस काय?
ईयोब 38 वाचा
ऐका ईयोब 38
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 38:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ