पुन्हा एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले; त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे.” परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही; त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवलेस, तरी तो आपल्या सत्त्वाला दृढ धरून राहिला आहे.” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नकोस.” मग सैतान परमेश्वरासमोरून गेला; आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले. ईयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली; आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही अजून सत्त्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.
ईयोब 2 वाचा
ऐका ईयोब 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 2:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ