पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्या वेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.] पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” ह्यावरून परूशी त्याला म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही. तुम्ही देहबुद्धीने न्याय करता; मी कोणाचा न्याय करत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे; कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही; तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.
योहान 8 वाचा
ऐका योहान 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 8:1-20
5 दिवस
तुम्ही कदाचित 'कृपा' हा शब्द ऐकला असेल, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? देवाची कृपा आपले जीवन कसे वाचवते आणि बदलते? ही अद्भुत कृपा आपल्याला जिथे आहोत तिथेच कशी भेटते आणि आपल्या कथा कशा बदलते हे जाणून घ्या |
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ