नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले; आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, “पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.” ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही.” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांला नियमशास्त्र आहे; आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले.” पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. पिलाताने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय?” येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.” ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.” हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. तेव्हा त्याने यहूद्यांना म्हटले, “पाहा, तुमचा राजा!” ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.” मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
योहान 19 वाचा
ऐका योहान 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 19:1-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ