YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 13:18-38

योहान 13:18-38 MARVBSI

मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत; तरी ‘ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.1 मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.” असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकूळ झाला व निश्‍चितार्थाने म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल.” तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता; म्हणून ज्याच्याविषयी तो बोलला तो कोण आहे हे आम्हांला सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे.” मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याला दिला. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे ते लवकर करून टाक.” पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यांतील कोणाला समजले नाही. कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावेत किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे, असे कित्येकांना वाटले. मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला; त्या वेळी रात्र होती. तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे; देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील; तो त्याचा लवकर गौरव करील. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल; आणि जसे मी यहूद्यांना सांगितले की, ‘जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही,’ तसे तुम्हांलाही आता सांगतो. मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने उत्तर दिले, “मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही; पण तू नंतर येशील.” पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन.” येशूने त्याला उत्तर दिले, “काय? माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? मी तुला खचीत खचीत सांगतो, तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

योहान 13:18-38 साठी चलचित्र