YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 10:22-39

योहान 10:22-39 MARVBSI

तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता; आणि येशू मंदिरामधील शलमोनाच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही; जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.” येशूने त्यांना म्हटले, “‘तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?” ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, - आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही - तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.” ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.

योहान 10:22-39 साठी चलचित्र