बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सर्व सैन्य, त्याच्या सत्तेखाली असलेली जगातली सर्व राज्ये व सर्व लोक ह्यांनी यरुशलेमेबरोबर व तिच्या सर्व नगरांबरोबर युद्ध चालवले, तेव्हा यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :
“परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, जा, आणि यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईन व तो ते अग्नीने जाळून टाकील;
तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, तर तुला पकडून त्याच्या हाती निश्चये देतील; तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील व तो तुझ्याबरोबर समक्ष बोलेल; तू बाबेलास जाशील.’
तथापि हे सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक; परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की, ‘तू तलवारीने मरणार नाहीस,
तर स्वस्थपणे मरशील; तुझ्या पूर्वीचे राजे, तुझे पूर्वज ह्यांच्याकरता धूप वगैरे जाळत, तसे ते तुझ्याकरता जाळतील व ‘हायरे, माझ्या स्वामी!’ असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; कारण हे वचन मी बोललो आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’
तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने ही सर्व वचने यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यरुशलेमेत सांगितली.
त्या वेळेस बाबेलचे सैन्य यरुशलेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका ह्यांवर चढाई करून युद्ध करीत होते; यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती.
सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :
ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याने त्याची सुटका करावी; कोणी आपल्या यहूदी बांधवांकडून दास्य करवून घेऊ नये.
तेव्हा आम्ही आपल्या सर्व दासांची व दासींची सुटका करू व ह्यापुढे त्यांना दास्य करायला लावणार नाही असा करार ज्या सर्व सरदारांनी व सर्व लोकांनी केला होता ते त्यांना मान्य झाले; त्यांनी मान्य होऊन दासांना मुक्त केले.
पण मागाहून ते बदलले व ज्या दासांना व दासींना त्यांनी मुक्त केले होते त्यांना त्यांनी परत यायला लावले व आपले दास व दासी होण्यासाठी त्यांना पुन्हा ताबेदारीत घेतले.
ह्यास्तव परमेश्वराकडून यिर्मयाला परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले की,
“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले तेव्हा मी त्यांच्याबरोबर करार केला की,
‘कोणी तुझ्या इब्री बांधवापैकी असून त्यास तुला विकले असले तर सात वर्षांच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या बंधूला बंधमुक्त करावे; त्याने सहा वर्षे तुझे दास्य केल्यावर त्याला तू मुक्त करून रवाना करावेस.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व आपला कान दिला नाही.
तुम्ही तर अलीकडे माझ्या दृष्टीने नीट ते करू लागला होता, तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या शेजार्याचे स्वातंत्र्य प्रसिद्धपणे ठरवले, व ज्या माझ्या मंदिराला माझे नाम दिले आहे त्यात तुम्ही माझ्यासमक्ष करार केला,
पण तुम्ही पुन्हा बदलून माझ्या नामाची अप्रतिष्ठा केली व प्रत्येकाने ज्या आपल्या दासाला व दासीला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य दिले होते त्यांना तुम्ही परत येण्यास लावले, व त्यांनी तुमचे दास व दासी व्हावे म्हणून त्यांना तुम्ही आपले ताबेदार केले.
ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.
आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघला व माझ्यासमोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत त्यांचे, जे वासरू त्यांनी कापून दुभागले व त्याच्या दोहो भागांमधून ते चालून गेले, त्या वासराप्रमाणे करीन.
यहूदाचे सरदार व यरुशलेमेचे सरदार, खोजे, याजक व देशातील सर्व लोक वासराच्या दोन भागांतून चालून गेले,
त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील त्यांच्या जिवांवर टपणार्यांच्या हाती देईन. म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.
आणि यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना मी त्यांच्या वैर्यांच्या हाती देईन, त्यांच्या जिवांवर टपणार्यांच्या हाती देईन व बाबेलच्या राजाचे जे सैन्य तुमच्यापुढून निघून गेले आहे त्याच्या हाती देईन.
परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा करून त्यांना ह्या नगराकडे परत यायला लावीन; ते त्याबरोबर लढून ते घेतील व ते अग्नीने जाळतील; मी यहूदाची नगरे ओसाड व निर्जन करीन.”