YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 31:31-40

यिर्मया 31:31-40 MARVBSI

परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.” जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की, “यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.” परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो. “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील; आणि मापनसूत्र पुन्हा एकदा थेट गारेबाच्या टेकडीवर लागेल व तेथून गवाथाकडे वळसा घेईल. प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपर्‍यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील; पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”