YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 17:19-27

यिर्मया 17:19-27 MARVBSI

परमेश्वर मला म्हणाला, “ज्या वेशीने यहूदाचे राजे येतातजातात त्या सार्वजनिक वेशीत व यरुशलेमेच्या सर्व वेशींत जाऊन उभा राहा; आणि लोकांना सांग, ‘अहो यहूदाच्या राजांनो, हे सर्व यहूदा, ह्या वेशींनी येणारे सर्व यरुशलेमनिवासी जनहो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणांविषयी सावध असा, शब्बाथ दिवशी काही ओझे वाहू नका, यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू-नेऊ नका. शब्बाथ दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका; काही कामधंदा करू नका, आणि तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा. पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली. तथापि परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे मनापासून ऐकून शब्बाथ दिवशी ह्या नगराच्या वेशींतून काही ओझे आणणार-नेणार नाही आणि शब्बाथ दिवशी काही कामधंदा न करता तो पवित्रपणे पाळाल, तर असे होईल की दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे व सरदार रथारूढ व अश्वारूढ होऊन आणि त्यांचे सरदार यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्या नगराच्या वेशींतून येजा करतील व हे नगर सर्वकाळ वसेल. यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील. पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’