YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 17:1-18

यिर्मया 17:1-18 MARVBSI

“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे; कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरामूर्ती ह्यांचे स्मरण ठेवते. हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन. मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.” परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश ह्यांत तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.” हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.” तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्‍याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल. आमच्या पवित्रस्थानाचे स्थळ, सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे. हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस. पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!” मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते. तू मला भीतिप्रद होऊ नकोस, विपत्काळी तू माझा आश्रय आहेस. माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!