YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 10:1-22

यिर्मया 10:1-22 MARVBSI

हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हांला जे वचन सांगतो, ते ऐका; परमेश्वर असे म्हणतो, “राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका; आकाशातील उत्पातांनी घाबरू नका; राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात. लोकांचे विधी व्यर्थ आहेत; अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातच्या हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्यारुप्याने ते भूषित करतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवतो. त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.” हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे. हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही. ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप! तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत. तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.” त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले. तो आपला शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो; तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो. प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही. त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात. जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून नीघ. कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी ह्या प्रसंगी ह्या देशाचे रहिवासी गोफणीतून भिरकावतो, मी त्यांना अशी पीडा करतो की ती त्यांना जाणवेल.” हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.” माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही. कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत; ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे. ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील.