YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 5:1-11

याकोब 5:1-11 MARVBSI

अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यांवर जंग चढला आहे; त्यांचा तो जंग तुमच्याविरुद्ध साक्ष होईल, आणि तो ‘अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल.’ शेवटल्या दिवसासाठी ‘तुम्ही धन साठवले आहे.’ पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला; तो तुम्हांला विरोध करत नाही. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका; पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले.