YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 2:14-26

याकोब 2:14-26 MARVBSI

माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा;” पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, “तुझ्या ठायी विश्वास आहे, आणि मला क्रिया आहेत.” क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय? आपला बाप ‘अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पण केले’ ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते. “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्‍या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.