YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 9:8-21

यशया 9:8-21 MARVBSI

प्रभूने याकोबाला संदेश पाठवला असून तो इस्राएलाच्या ठायी प्रविष्ट झाला आहे. “विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिर्‍यांचे बांधकाम करू, उंबरांची झाडे तोडून टाकली आहेत तर त्यांच्या जागी गंधसरू लावू.” असे गर्वाने व उद्दामपणाने म्हणणार्‍या सर्व लोकांना म्हणजे एफ्राइमास व शोमरोनच्या रहिवाशांना हे कळून येईल. परमेश्वर रसीनाच्या योद्ध्यांचा त्याच्यावर वरचष्मा करील, त्याच्या शत्रूंना उठवील. पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे. तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत. म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची झावळी व लव्हाळा ही एका दिवसात छेदून टाकील. वडील व सन्मान्य पुरुष हा शीर असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट. ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत. ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे. दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो. सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही. ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो, मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.