YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 51:1-16

यशया 51:1-16 MARVBSI

“तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका; ज्या खडकातून तुम्हांला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हांला खणून काढले त्याकडे लक्ष द्या. अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे. माझ्या लोकांनो, माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रजे, माझ्याकडे कान दे; कारण माझ्यापासून नियमशास्त्र निघेल व राष्ट्रांना प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या न्यायाची संस्थापना करीन. माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे. वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या; कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटांप्रमाणे मरतील; तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही. हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यांना कीड खाऊन टाकील; माझा न्याय तर सर्वकाळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील.” हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय? ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उद्धरलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध डोहांतून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? परमेश्वराने उद्धरलेले जन परततील व जयजयकार करत सीयोनेस येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांना आनंद व उल्लास प्राप्त होईल; दुःख व उसासे पळ काढतील. “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण? आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भितेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे? दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी समुद्र खवळवतो तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करतात; सेनाधीश परमेश्वर हे माझे नाम आहे. मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व ‘तू माझी प्रजा आहेस’ असे सीयोनेस म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली; आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली.”