सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.”
पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे.
मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्यांना सांभाळून नेईल.
जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत?
परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे?
त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकवले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला?
पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो.
लबानोन जळणास पुरायचा नाही व त्यावरील वनपशू होमास पुरे पडायचे नाहीत;
सर्व राष्ट्रे त्याच्यापुढे काहीच नाहीत; त्याच्या हिशोबी ती अभाव व शून्यता ह्यांहूनही कमी आहेत.
तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?
कारागीर मूर्ती ओतून तयार करतो, सोनार तिला सोन्याच्या पत्र्याने मढवतो, तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडतो.
जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो.
तुम्हांला कळत नाही काय? तुम्हांला ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हांला हे कळवले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हांला समजले नाही काय?
हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो.
तो अधिपतींना कस्पटासमान लेखतो, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो.
त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.
मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो.
आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.
हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की, “माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे?”
तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.
तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.
तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात;
तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.