YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 40:18-26

यशया 40:18-26 MARVBSI

तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? कारागीर मूर्ती ओतून तयार करतो, सोनार तिला सोन्याच्या पत्र्याने मढवतो, तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडतो. जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो. तुम्हांला कळत नाही काय? तुम्हांला ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हांला हे कळवले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हांला समजले नाही काय? हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो. तो अधिपतींना कस्पटासमान लेखतो, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो. त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते. मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो. आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.