खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे; तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे; राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या-त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे. ते सर्व उठून तुला म्हणतात, ‘तूही आमच्याप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस काय?’ तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे; तुझ्याखाली कृमींचे अंथरूण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरूण झाले आहे. हे देदिप्यमान तार्या,1 प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्रांना लोळवणार्या तुला धुळीत कसे टाकले! जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन; मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन;’ त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापवली व राज्ये डळमळवली तो हाच का पुरुष? ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’ राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत; पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे; वधलेले, तलवारीने विंधलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले ह्यांनी तू वेष्टला आहेस. पायांखाली तुडवलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस.
यशया 14 वाचा
ऐका यशया 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 14:9-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ