YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 7:11-28

इब्री 7:11-28 MARVBSI

ह्यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती तर ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या’ निराळ्या ‘याजकाचा’ उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या ‘संप्रदायाप्रमाणे’ म्हटलेले नसावे ह्याचे काय अगत्य राहिले असते? कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते. कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे; त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही. आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा ‘मलकीसदेकासारखा’ निराळा ‘याजक’ जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, “तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस.” पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही, (ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे] “‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,” असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला), त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. ते पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे; पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.