YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 7:1-10

इब्री 7:1-10 MARVBSI

‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’ व ‘अब्राहामाने’ त्याला ‘सर्व लुटीचा दशमांश’ दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे ‘शालेमाचा राजा’ म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची माता-पितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही, तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. लेवीच्या संतानांपैकी, ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. परंतु जो त्यांच्या वंशातला नव्हता त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे. इकडे पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर, जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे, त्याला मिळाले. आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता.