ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले; त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, “मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस? तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस; तू सर्वकाही त्याच्या अधीन — त्याच्या पायांखाली — ठेवले आहेस.” ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाहीस; परंतु ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला ‘देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते,’ तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत, ह्या कारणास्तव त्यांना ‘बंधू’ म्हणायची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, “मी आपल्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन.” आणि पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” तसेच, “पाहा, मी व देवाने मला दिलेली मुले.” ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण, खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.’1 म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.
इब्री 2 वाचा
ऐका इब्री 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 2:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ