YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हाग्गय 1:3-15

हाग्गय 1:3-15 MARVBSI

तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे : “इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा; त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहिवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे. मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.” तेव्हा शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर ह्याच्या वाणीस मान दिला, आपला देव परमेश्वर ह्याने पाठवलेल्या हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराचे भय धरू लागले. मग परमेश्वराचा निरोप्या हाग्गय ह्याने परमेश्वराचा निरोप लोकांना कळवला; तो म्हणाला, “मी तुमच्याबरोबर आहे,” असे परमेश्वर म्हणतो. यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक ह्याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक ह्यांच्या आत्म्यांना परमेश्वराने स्फूर्ती दिली; तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले; हे दारयावेश राजाच्या कारकिर्दिच्या दुसर्‍या वर्षी सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले.