YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 48:8-16

उत्पत्ती 48:8-16 MARVBSI

इस्राएलाच्या दृष्टीला योसेफाचे मुलगे पडले तेव्हा तो म्हणाला, “हे कोण?” योसेफ आपल्या बापाला म्हणाला, “हे माझे मुलगे, देवाने मला हे ह्या देशात दिले.” तेव्हा तो म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.” इस्राएलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यांना त्याच्याजवळ नेले. तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यांना आलिंगन दिले. इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे तोंड पुनरपि माझ्या दृष्टीस पडेल ह्याची मला कल्पना नव्हती, पण आता पाहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे.” मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. मग त्या दोघांना एफ्राइमास आपल्या उजव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. इस्राएलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राइमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला; त्याने आपले हात उजवेडावे केले; मनश्शे तर ज्येष्ठ होता. त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले, ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”