उत्पत्ती 45:4-11
उत्पत्ती 45:4-11 MARVBSI
योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “अंमळ जवळ या.” आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच. तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले. ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही. देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे. तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की, देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका; तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्वकाही घेऊन माझ्याजवळ राहावे. कारण पाच वर्षे दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही.

