ह्यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेमास गेले.
मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.”
तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा. तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पाहा आणि मला येऊन सांग.” ह्याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोर्यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहचला.
तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?”
तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.”
तो मनुष्य म्हणाला, “ते येथून निघून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला आणि ते त्याला दोथानात सापडले.
त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला.
ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे.
तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!”
हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.”
रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला.
योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला,
आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते.
मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले.
तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ?
चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले.
ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.
रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.
तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, “मुलगा तर नाही; आता मी कोठे जाऊ?”
मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला;
आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला; तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, “हा आम्हांला सापडला; हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा.”
त्याने तो ओळखून म्हटले, “हा माझ्या मुलाचाच झगा! हिंस्र पशूने त्याला खाल्ले, योसेफाला फाडून टाकले ह्यात संशय नाही.”
तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, “मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला.
मिद्यानी लोकांनी योसेफाला मिसरात नेऊन पोटीफर नावाचा फारोचा एक अंमलदार गारद्यांचा सरदार होता, त्याला विकून टाकले.