YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 37:1-28

उत्पत्ती 37:1-28 MARVBSI

याकोब कनान देशात वस्ती करून राहिला; तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तान्त1 हा : योसेफ सतरा वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली. इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता; त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न ऐका : पाहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली; तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले.” हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “काय, तू आमच्यावर राज्य करणार? तू आमच्यावर सत्ता चालवणार?” आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले, तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की, सूर्य, चंद्र व अकरा तारे ह्यांनी मला नमन केले.” त्याने हे स्वप्न आपल्या बापाला व भावांना सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, “हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यासाठी तुझ्यापुढे येणार?” त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात ह्यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेमास गेले. मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.” तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा. तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पाहा आणि मला येऊन सांग.” ह्याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोर्‍यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहचला. तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?” तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.” तो मनुष्य म्हणाला, “ते येथून निघून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला आणि ते त्याला दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!” हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला, आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.