नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की, आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे, आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळवली आहे. लाबान पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले. परमेश्वराने याकोबाला सांगितले की, “तू आपल्या पूर्वजांच्या देशी, आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन.” तेव्हा याकोबाने राहेल व लेआ ह्यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलावले. त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हांला ठाऊक आहे; तरी तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. त्याने जेव्हा म्हटले की, ‘ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुला वेतनादाखल मिळतील,’ तेव्हा सर्व कळपांना ठिपकेदार पोरे होऊ लागली; त्याने जेव्हा म्हटले की, ‘बांड्या तुझ्या,’ तेव्हा सर्व कळपांना बांडी पोरे होऊ लागली. ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. कळप फळायच्या ऋतूत मी स्वप्नात आपली दृष्टी वर करून पाहिले तो मेंढ्यांवर उडणारे एडके बांडे, ठिपकेदार व करडे होते. तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, “याकोबा”; मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?” तो म्हणाला, “आपली दृष्टी वर करून पाहा; मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे, ठिपकेदार व करडे आहेत; लाबान तुझ्याशी कसा वागत आहे हे मी पाहिले आहे. बेथेल येथे तू एका स्तंभाला अभ्यंग करून मला नवस केला तेथला मी देव आहे; आता ह्या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा.” तेव्हा राहेल व लेआ त्याला म्हणाल्या, “आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आमच्यासाठी थोडेच ठेवले आहे? त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हांला विकून टाकले आहे, आणि आमचे धनही खाऊन टाकले आहे. ह्यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे; तर आता देवाने आपल्याला सांगितले आहे तसे करा.” मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका ह्यांना उंटांवर बसवले; आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन-अरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसहाक ह्याच्याकडे कनान देशास जायला निघाला. लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम (गृहदेवता) चोरल्या. ह्याप्रमाणे याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण पळून जात आहोत हे त्याने त्याला कळू दिले नाही. मग तो आपले सर्वकाही घेऊन पळून गेला; तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखवला.
उत्पत्ती 31 वाचा
ऐका उत्पत्ती 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 31:1-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ