YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 25:19-26

उत्पत्ती 25:19-26 MARVBSI

अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याची ही वंशावळ : अब्राहामाने इसहाकास जन्म दिला. इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान ह्याची बहीण पदन-अरामातील अरामी बथुवेल ह्याची कन्या रिबका ही बायको केली. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती; परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.” तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला; तेव्हा पाहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते; त्याचे नाव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला; एसावाची टाच त्याच्या हाती होती; आणि त्याचे नाव याकोब (टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.