अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा. तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन.” तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला : “पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. ह्यापुढे तुला अब्राम (श्रेष्ठ पिता) म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील. कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अति फलसंपन्न करीन; तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो. ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.” देव अब्राहामाला आणखी म्हणाला, “आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती ह्यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा : तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी. तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी; ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष आठ दिवसांचा झाला की त्याची सुंता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला, परक्यांपासून पैसे देऊन विकत घेतलेला असो. तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैसे देऊन विकत घेतलेल्याची सुंता अवश्य व्हावी; म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. कोणाची सुंता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा; त्याने माझा करार मोडला असे होईल.” मग देवाने अब्राहामाला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही; तर तिचे नाव सारा (राणी) होईल. मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन; मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील; तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” अब्राहामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, “शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय?” अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले.” मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक ठेव; त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे; पाहा, मी त्याचे कल्याण करीन; त्याला सफळ व बहुगुणित करीन; त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील; मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी ह्याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल; त्याच्याशीच मी आपला करार करीन.” मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर देव त्याला सोडून वर गेला. तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल, आपल्या घरी जन्मलेले व पैसे देऊन विकत घेतलेले आपले सर्व दास ह्यांना म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून देवाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुंता केली. अब्राहामाची सुंता झाली तेव्हा तो नव्व्याण्णव वर्षांचा होता. त्याचा मुलगा इश्माएल ह्याची सुंता झाली तेव्हा तो तेरा वर्षांचा होता. अब्राहाम व त्याचा मुलगा इश्माएल ह्यांची त्याच दिवशी सुंता झाली. आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून पैसे देऊन विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष ह्यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.
उत्पत्ती 17 वाचा
ऐका उत्पत्ती 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 17:1-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ