अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली. अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे वरकड स्नेही ह्यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहून पाठवले; हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते. राजमंत्री रहूम व लेखक शिमशय ह्यांनी यरुशलेमेविरुद्ध अर्तहशश्त राजाला पुढे लिहिल्याप्रमाणे पत्र पाठवले. त्या प्रसंगी रहूम राजमंत्री, शिमशय लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथखी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी, इत्यादी लोक ज्यांना महान व प्रतापी आसनपर ह्याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसवले होते, त्यांनी व इतर जनांनी हे पत्र लिहिले. अर्तहशश्त राजाला त्यांनी पत्र पाठवले त्याची नक्कल ही : “नदीच्या पश्चिमेकडील आपले सेवक इत्यादी - महाराजांना कळावे की जे यहूदी आपणाकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहचले; त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे; त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे; महाराजांस हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यायचे नाहीत; एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल. आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहोत व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हांला शोभत नाही म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजांना हे कळवत आहोत; आपल्या वाडवडिलांच्या बखरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणांस कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते. आम्ही महाराजांना हे निक्षून सांगतो की, हे नगर बांधण्यात आले व ह्याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्चिमेकडे आपला काहीच मुलुख राहायचा नाही.” मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी - “तुम्ही आमच्याकडे पाठवलेले पत्र आमच्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले. माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंड करीत आले आहे; बंड व राजद्रोह ह्यांचे हे माहेरघरच आहे. ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत. तर आता असे फर्मान फिरवा की ह्या मनुष्यांनी काम बंद पाडावे, माझ्याकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये. सांभाळा, ह्या गोष्टींसंबंधाने ढिलाई करू नका; राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा?” अर्तहशश्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही ह्यांना वाचून दाखवले, तेव्हा ते त्वरा करून यरुशलेमेस यहूद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले. ह्या प्रकारे यरुशलेमेतील देवाच्या मंदिराचे काम थांबले आणि पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षापर्यंत तहकूब राहिले.
एज्रा 4 वाचा
ऐका एज्रा 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एज्रा 4:6-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ