YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 47:1-12

यहेज्केल 47:1-12 MARVBSI

मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तेव्हा पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तरद्वाराच्या वाटेने बाहेर नेले, व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, तेव्हा पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी कंबरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले तर त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस ना?” मग त्याने मला नदीतीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यात जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यात मासे विपुल होतील, कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील. त्यातील पाणथळे व दलदली ह्यांचे पाणी निर्दोष होणार नाही; ती खारटाणेच राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतर्‍हेची झाडे वाढतील; त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्‍व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे; त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील.”