मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले. हे यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते; त्या महिन्याच्या पाचव्या दिवशी खास्द्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बूजीचा पुत्र यहेज्केल याजक ह्याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले; तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर आला. मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते. त्याच्या मध्यभागी चार जिवंत प्राण्यांच्या आकृतींसारखे काही बाहेर पडले; दिसण्यात ते मनुष्याकृती होते. त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते. त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यांसारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते. त्यांच्या चोहोबाजूंना पंखांच्या खाली त्यांना माणसांचे हात होते; त्या चौघांना मुखे व पंख होते. त्यांचे पंख एकाचे दुसर्याशी लागलेले होते; ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात. त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते, त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते; त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते; आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते, अशी त्यांची मुखे होती. वरच्या अंगी त्यांची मुखे व त्यांचे पंख विभक्त होते. प्रत्येकाचे दोन पंख जवळील दुसर्याच्या एकेका पंखाला लागले होते; आणि प्रत्येकाच्या दोन-दोन पंखांनी त्यांचे शरीर आच्छादले होते. ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात; आत्मा नेई तिकडे जात; चालताना वळत नसत. त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे, मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता; तो धगधगीत असून त्यातून विद्युल्लता निघत होती. ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत. मी त्या प्राण्यांकडे पाहिले तेव्हा त्यांच्याजवळ त्यांच्या चारही मुखांच्या बाजूस भूमीवर एकेक चाक होते. ती चाके व त्यांचा घाट ही वैडूर्य मण्यांसारखी दिसत होती; त्या चोहोंचा आकार एकच होता; त्यांचा आकार व घाट जणू काय चाकांत चाक असा होता. ते चालत तेव्हा ते चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत; चालताना वळत नसत. चाकाच्या धावा पाहिल्या तर त्या फार उंच व भयानक होत्या; त्या चोहोंच्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते. ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्यांच्याबरोबर चालत आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत. जिकडे आत्मा नेई तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात; त्यांच्याबरोबर चाकेही उचलत, कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकांत होता. ते चालले म्हणजे ही चालत; ते थांबले म्हणजे हीही थांबत; ते जमीन सोडून वर चढले म्हणजे त्यांच्याबरोबर चाकेही चढत; कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकांत होता. त्या प्राण्यांच्या माथ्यावर चांदव्यासारखे (अंतराळा-सारखे) काही होते, ते दिपवणार्या व भयानक स्फटिकासारखे दिसले; ते त्यांच्या डोक्यावरून ताणलेले होते. त्या चांदव्याखाली त्यांचे पंख नीट पसरून एकमेकांना लागलेले होते; ह्या बाजूला आणि त्या बाजूला शरीर आच्छादणारे असे प्रत्येकाला दोन-दोन पंख होते. ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला; तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता; लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत. त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यातून वाणी होत असे; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत. त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता. त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला; त्याच्या कंबरेपासून वर व त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास मला झाला व त्यांच्याभोवती प्रभा चमकत होती. पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्या धनुष्याप्रमाणे त्यांच्याभोवती प्रभा फाकलेली मला दिसली; परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उपडा पडलो व कोणा बोलणार्याची वाणी माझ्या कानी आली.
यहेज्केल 1 वाचा
ऐका यहेज्केल 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 1:1-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ