YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 8:8-15

निर्गम 8:8-15 MARVBSI

मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “परमेश्वराला विनवणी करा की, माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन.” मोशे फारोला म्हणाला, “तुझ्यापासून व तुझ्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावेत म्हणून मी तुझ्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी आणि तुझ्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी, हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.” तो म्हणाला, “उद्या.” तेव्हा मोशेने म्हटले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, मग तुला कळेल की, आमचा देव परमेश्वर ह्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. बेडूक तुझ्यापासून, तुझ्या घरातून, तुझ्या सेवकांपासून, तुझ्या प्रजेपासून दूर होतील; ते फक्त नदीत राहतील.” मोशे आणि अहरोन फारोकडून निघाले; आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्यासंबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; घरीदारी, गावात व शेतांत बेडूक होते, ते सर्व मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली. ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.