YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 4:1-14

निर्गम 4:1-14 MARVBSI

तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.” तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” तो म्हणाला, “काठी आहे.” त्याने म्हटले, “ती जमिनीवर टाक.” ती त्याने टाकताच तिचा साप झाला; त्याला पाहून मोशे पळाला, परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर - त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली; “ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.” परमेश्वराने त्याला आणखी सांगितले, “आता आपला हात छातीवर ठेव.” त्याने हात छातीवर ठेवून बाजूला काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला. मग त्याने त्याला सांगितले, “पुन्हा आपला हात छातीवर ठेव ” तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेवला, आणि छातीवरून बाजूला काढला तेव्हा पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला. “त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते ह्या दुसर्‍या चिन्हाची सूचना खरी मानतील. पण जर त्यांनी ह्या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही, तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.” तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.” तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन.” तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.” मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला, तो त्याला म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ नाही काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पाहा, तो तुला भेटायला येत आहे; तुला पाहून त्याला मनात आनंद होईल.