YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 36:1-19

निर्गम 36:1-19 MARVBSI

परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्रस्थानाच्या सेवेसाठी सर्व तर्‍हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाने आणतात नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले, आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी, म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला. इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले, आणि ते मोशेला म्हणाले, “परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करायला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की, कोणाही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. ह्याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांना प्रतिबंध झाला. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनवला; हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यांवर कुशल कारागिराकडून करूब काढवले. एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती; ते सर्व पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी त्यांतले पाच पडदे एकमेकांशी जोडले, व दुसरे पाच पडदे एकमेकांशी जोडले. त्यांनी जेथे एक पडदा जोडला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लावली, तसेच दुसर्‍या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली. एका पडद्याला त्यांनी पन्नास बिरडी केली व दुसर्‍या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ही बिरडी समोरासमोर होती. तसेच त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे बनवले; त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडले की, सर्व मिळून निवासमंडप अखंड झाला. निवासमंडपावर तंबू असावा म्हणून बकर्‍यांच्या केसांचे अकरा पडदे त्यांनी बनवले. एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात होती; हे अकरा पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी पाच पडदे वेगळे जोडले व सहा पडदे वेगळे जोडले. अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी पन्नास बिरडी केली, तशीच दुसर्‍या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी पन्नास बिरडी केली. हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे बनवले. ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन त्यांनी केले.