YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 20:15-26

निर्गम 20:15-26 MARVBSI

चोरी करू नकोस. आपल्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. आपल्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजार्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस. मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले, आणि मोशेला म्हणाले, “आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू.” तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे. लोक दूर उभे राहिले, पण देव निबिड अंधकारात होता, तिकडे मोशे गेला. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग : मी तुमच्याशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका. माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन. तू माझ्यासाठी दगडांची वेदी बांधशील तर ती घडलेल्या चिर्‍यांची नसावी, कारण तू आपले हत्यार दगडाला लावल्यास तो तुझ्याकडून अपवित्र होईल. तुझी नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू तिच्यावर पायर्‍यांनी चढता कामा नये.