YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 20:1-17

निर्गम 20:1-17 MARVBSI

आणि देव हे सर्व शब्द बोलला : ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो; आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा, ह्यांनीही करू नये; कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नकोस. व्यभिचार करू नकोस चोरी करू नकोस. आपल्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. आपल्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजार्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.