YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 15:1-18

निर्गम 15:1-18 MARVBSI

तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला हे गीत गाईले; ते म्हणाले, “मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश (याह) माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे; हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; हाच माझ्या पित्याचा देव मी ह्याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत; त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. गहिर्‍या जलांनी त्यांना गडप केले आहे; ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो. आपल्याविरुद्ध बंड करणार्‍यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकतोस; तू आपला संताप भडकवतोस, तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करतो. तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलांच्या राशी बनल्या जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले. शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल; मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन. तू आपल्या वार्‍याने फुंकले, तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे? तू आपला उजवा हात उगारलास, आणि पृथ्वीने त्यांना गिळून टाकले. तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस. हे ऐकून राष्ट्रे कंपायमान झाली आहेत; पलेशेथवासी भयभीत झाले आहेत. तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले; मवाबाचे नायक थरथरा कापत आहेत; सर्व कनानवासी गलित झाले आहेत. भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्‍चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल. तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील; हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे. परमेश्वर युगानुयुग राज्य करील.”