YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 9:1-10

एस्तेर 9:1-10 MARVBSI

अदार जो बारावा महिना त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फर्मान अंमलात येऊन यहूदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, पण सर्व उलट होऊन यहूदी लोक आपल्या वैर्‍यांवर वरचढ झाले; आपणांस उपद्रव करू पाहणार्‍या वैर्‍यांना हात दाखवावा म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपापल्या गावी एकत्र झाले; त्यांच्याशी कोणालाही सामना करवेना; त्यांचा सर्व लोकांना धाक बसला. प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालवणारे सर्व जण ह्यांनी यहूद्यांना कुमक केली; त्या सर्वांना मर्दखयाचा धाक बसला होता. मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतांतून पसरली होती; मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला. इकडे यहूदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तलवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला; मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला. शूशन राजवाड्यात यहूदी लोकांनी पाचशे लोकांचा वध करून त्यांचा धुव्वा उडवला. पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, पोराथा, अदल्या, अरीदाथा, पर्मश्ता, अरीसई, अरीदय व वैजाथा, हे यहूद्यांचा वैरी हामान बिन हम्मदाथा ह्याचे दहा पुत्र त्यांनी ठार केले, पण लुटीस त्यांनी हात लावला नाही.