YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 2:10-18

एस्तेर 2:10-18 MARVBSI

एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही; तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते. एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्‍या घालत असे. स्त्रियांसाठी ठरवलेल्या नियमांप्रमाणे बारा महिन्यांपर्यंत सर्वकाही उपचार झाल्यावर एकेका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यांना गंधरसाचे तेल सहा महिने व सुगंधी द्रव्ये सहा महिने लावत असत; शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यांना लावत असत. कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा : अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई; संध्याकाळी ती जात असे; आणि सकाळी ती उपपत्न्यांचा रक्षक राजाचा खोजा शाशगज ह्याच्या देखरेखीखाली दुसर्‍या अंतःपुरात जाई; राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलावल्यावाचून ती पुन्हा त्याच्याकडे जात नसे. मर्दखयाचा चुलता अबीहाईल ह्याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून सांभाळले होते, तिची राजाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे ह्याने जे तिला देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने-ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली. ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले. मग राजाने सर्व सरदार व सेवक ह्यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली; प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली.