YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 1:1-15

एस्तेर 1:1-15 MARVBSI

अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले; त्याचे साम्राज्य हिंदुस्तानापासून कूशापर्यंत होते; ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतांवर होता तोच हा अहश्वेरोश. अहश्वेरोश राजाने शूशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले; त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहानथोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात सात दिवस मेजवानी दिली. तेथील पडदे पांढर्‍या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्‍यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्‍या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते. त्या मेजवानीत राजाला पिण्यास योग्य असा द्राक्षारस तर्‍हेतर्‍हेच्या सुवर्णपात्रांत घालून राजाच्या औदार्यानुसार लोकांना विपुल पिण्यास देण्यात आला. हे पिणे नियमानुसार असे; कोणी कोणाला आग्रह करीत नसे; राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभार्‍यांना आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी. वश्ती राणीनेही राजा अहश्वेरोश ह्याच्या राजमंदिरात स्त्रियांना मेजवानी दिली. सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की, वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती. खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वश्ती राणीने येण्याचे नाकारले; त्यावरून राजाला फार क्रोध येऊन तो संतप्त झाला. मग राजाने काळ जाणणार्‍या पंडितांना विचारले; (तो राजा सर्व न्यायशास्त्री व कायदेतज्ज्ञ ह्यांचा असा सल्ला घेत असे; त्याच्याजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले सात सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे;) राजाने त्यांना विचारले की, “अहश्वेरोशाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वश्ती राणीने मानली नाही तर आम्ही कायदेशीर रीतीने तिचे काय करावे?”