YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 1:13-23

इफिसकरांस पत्र 1:13-23 MARVBSI

तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून, मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले; आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले; त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले; हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.1