सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा. भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते; पण मूर्खांचे चित्त हास्यविनोदगृहाकडे लागते. मूर्खांचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे. कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणार्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेही व्यर्थ होय. जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो; लाच खाल्ल्याने बुद्धीला भ्रंश होतो. एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. “ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे. वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे; भूतलावर जन्म पावलेल्यांना1 ते विशेष हितावह आहे. ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्याजवळ शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते. देवाची करणी पाहा; त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल? संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत. एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे. फाजील नीतिमान होऊ नकोस; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नकोस; तू आपला नाश का करून घ्यावास? दुष्टतेचा अतिरेक करू नकोस; मूर्ख होऊ नकोस; तू अकाली का मरावे? ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल. नगरातल्या दहा अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते. सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नकोस, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील; कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे. मी ह्या सर्व गोष्टी विवेकाने अजमावून पाहिल्या आहेत; “आपण ज्ञानसंपन्न व्हावे,” असे मी म्हणालो, पण ते माझ्यापासून दूरच राहिले. जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे; त्याचा थांग कोणाला लागणार? ज्ञान व विवेक ही समजून घेऊन त्यांचे रहस्य जाणावे व त्यांचा शोध लावावा, आणि दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे, हे समजावे म्हणून मी फिरून आपले चित्त ह्या गोष्टींकडे लावले. मला मृत्यूहूनही दु:खदायी अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय; तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे; तिचे हात शृंखला आहेत; जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो; पापी तिच्या तावडीत सापडतो. उपदेशक1 म्हणतो, हिशोब पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे : पण मी आजवर धुंडाळत आहे तरी मला आढळले नाही ते हे : हजारांत एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही. पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.
उपदेशक 7 वाचा
ऐका उपदेशक 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उपदेशक 7:1-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ