तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बर्यासाठी सांगत आहे ते तू पाळावेस, तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो? पाहा, आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्वकाही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे; असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली म्हणून त्याने त्यांच्यामागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हांला, सर्व राष्ट्रांतून आजच्याप्रमाणे निवडून घेतले, हे आज विदितच आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. तो अनाथ व विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयावर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवतो. तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्हीसुद्धा मिसर देशात परदेशीय होता. आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे, आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत. तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.
अनुवाद 10 वाचा
ऐका अनुवाद 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 10:12-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ