YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 2:1-11

दानीएल 2:1-11 MARVBSI

नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न समजण्या-विषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे.” ते खास्दी लोक राजाला अरामी भाषेत म्हणाले, “महाराज, चिरायू असा; आपले स्वप्न ह्या दासांना सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत. पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हांला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल; ह्यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा.” ते पुन्हा त्याला म्हणाले, “महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” तेव्हा राजाने म्हटले, “मला खातरीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हांला ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे; परंतु तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही, तर तुमच्यासंबंधाने एकच हुकूम आहे. हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हांला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल.” खास्द्यांनी राजास उत्तर केले, “महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सार्‍या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिष्यांना, मांत्रिकांना किंवा खास्द्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे; मानवात वास न करणार्‍या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही.”