YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 9:10-27

प्रेषितांची कृत्ये 9:10-27 MARVBSI

इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता; त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभू?” प्रभू त्याला म्हणाला, “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करत आहे; आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे.” तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे; आणि येथेही तुझे नाव घेणार्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.” परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे; आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.” तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.” तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला, आणि त्याने लगेचच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे.” तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, “हे नाव घेणार्‍यांचा ज्याने यरुशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकांकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना?” पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिष्कात राहणार्‍या यहूदी लोकांना कुंठित करत राहिला. असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला; पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरता रात्रंदिवस वेशींवर पाळत ठेवली होती; परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीत बसवून गावकुसावरून खाली उतरवले. मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ‘हा शिष्य आहे’ असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 9:10-27 साठी चलचित्र