YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 5:1-42

प्रेषितांची कृत्ये 5:1-42 MARVBSI

हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की, सुमारे तीन तासांनी त्याची बायको आत आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या नवर्‍याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले. ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत. आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले; इतके की लोक दुखणेकर्‍यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवत; ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावांतून लोकसमुदाय दुखणेकर्‍यांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत; आणि ते सर्व बरे होत असत. तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत; म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले की, “बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि बाहेर दरवाजांपुढे पहारेकरी उभे राहिलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही.” हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणार्‍यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.” हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली; तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसांत पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले; त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल; परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.” तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि ‘येशूच्या नावाने बोलू नका’ अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले. आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही.

प्रेषितांची कृत्ये 5:1-42 साठी चलचित्र